आज जम्मू काश्मीरमधील बिलावर येथे एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे खर्गे यांना काही काळासाठी भाषण थांबवून विश्रांती घ्यावी लागली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे प्रचारसभेत भाषण करत असताना बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले. काही वेळाने ते खाली बसले आणि काही मिनिटे भाषण केले, पण मध्येच थांबले. नंतर त्यांनी उभे राहून २ मिनिटे भाषण केले. निघताना त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की, मी ८३ वर्षांचे असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, असे ते म्हणाले होते.
यावेळी भाजपावर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, या लोकांना कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते, असा आरोपही खर्गे यांनी केला.
जम्मू-काश्मीरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.