नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विविध शाळांच्या विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. यादरम्यान मुलांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी खूप आनंदी दिसले. सोबतच मुलंही पंतप्रधानांना भेटून आनंदित दिसत होती. यावेळी मुलांनी घोषणाबाजीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत देशवासियांना देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, बहीण आणि भावामधील अतूट विश्वास आणि अपार प्रेमाला समर्पित असलेला रक्षाबंधनाचा हा शुभ सण आपल्या संस्कृतीचे पवित्र प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सौहार्द आणि समरसतेचा भाव वाढवतो, अशी माझी इच्छा आहे.
रक्षाबंधन सण ३० ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असा मेसेज व्हायरल होत आहे त्यात काहीही तथ्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितले.
सुपर-ब्ल्यू मूनचे होणार दर्शन
बुधवार ३० ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यादिवशी सायं. ६:४० वा. चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री ५:१९ वा. पश्चिमेला मावळेल. तसेच, चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार १८२ किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल, तर बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे.