नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खर्गे या निवडणुकीत विजय झाला. खर्गे यांना तब्बल ७ हजार ८९७ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतांवर समाधान मानावे लागले. खर्गे यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खर्गे यांचे अभिनंदन केले आहे.
"मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी होवो, असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी बऱ्याच वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी सुरुवातील अशोक गहलोत यांचं नाव आघाडीवर होते. दरम्यान, निर्माण झालेल्या वादानंतर गहलोत यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव समोर आलं होतं. तर त्यांच्या विरोधात शशी थरूर यांनी निवडणूक लढवली होती.
दरम्यान, शशी थरूर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं अभिनंदन करणारं पत्र लिहिलं आहे. तसेच काँग्रेसच्या पुनरुद्धारास आजपासून सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी व्यक्त केली.