नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. जगभरात एवढे कार्यकर्ते असणारा भाजप मोठा पक्ष असल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजप आपला ४२ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत घराणेशाहीच्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केल्याचे म्हटले आहे.
सध्या देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक म्हणजे एका विशिष्ट घराण्याची भक्ती आणि दुसरे म्हणजे देशभक्ती. देशातील काही पक्ष केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपनेच प्रथम घराणेशाहीविरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि हा निवडणुकीचा मुद्दा ठरला. घराणेशाहीचे सरकार लोकशाहीचे शत्रू असून, ते संविधानाला महत्त्व देत नाही, ही बाब आता देशवासीयांच्या लक्षात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
भाजपने देशवासींयांचे नुकसान थांबवले
घराणेशाहीच्या पक्षांना भाजपने जोरदार टक्कर दिली आणि देशवासीयांचे नुकसान होऊ दिले नाही, असे सांगत भाजपचा हा स्थापना दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. जगात मोठ्या घडामोडी घडत असून, भारतासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडवला आहे. तसेच तीन दशकांनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या १०० वर गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजप कार्यकर्ते देशवासीयांच्या स्वप्नांचे प्रतिनिधी आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी हा कर्तव्याचा काळ आहे. देश बदलतो आहे. देशाकडे आता निर्णयशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमापर्यंत एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा भाजप आणखी सशक्त करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चैत्री नवरात्राच्या शुभेच्छाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्या.