ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - लोकसभा निवडणूक प्रचारात वाराणसीच्या मतदारांना विकासाचे गाजर दाखवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही वाराणसीवर खर्च केलेला नाही. तर महाराष्ट्रातील खासदारही खासदार निधी खर्च करण्यात उदासीन दिसत आहेत.
केंद्र सरकारकडून लोकप्रतिनिधींना आत्तापर्यंत मिळालेला एकूण विकास निधीं व त्यापैकी खर्च झालेला निधी याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीला जवळपास ८ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. देशभरातील ३६ राज्यांमधील (केंद्रशासीत प्रदेश मिळून) फक्त १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील खासदारांनी अद्याप खासदार निधीला हातही लावलेला नाही.
मे २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत खासदारांना एकूण १२४२.५० कोटी रुपयांचा खासदार निधी देण्यात आलेला आहे. उत्तरप्रदेशमधून ८० खासदार लोकसभेवर निवडून जातात. यामध्ये वाराणसी मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशमधील खासदारांना खासदार निधींतर्गत आत्तापर्यंत १९७.५० कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र यापैकी एकाही खासदाराने हा निधी खर्च केलेला नाही.
खासदारांना दरवर्षी ५ कोटी रुपयांचा खासदार निधी विकास कामांसाठी दिला जातो. या निधीतून खासदार त्यांच्या मतदारसंघातील गरजा पूर्ण करु शकतात. हा निधी पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यासाठी वापरला जाऊ शकतो.