ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - पाकिस्तानचा धावता दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पालम विमानतळावर मोदींचे स्वागत केले. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पाकिस्तानचा धावता दौरा केला. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास लाहोर विमानतळावर मोदी यांचे आगमन झाले. नरेंद्र मोदी विमानातून उतरल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गळाभेट घेऊन मोदींचे स्वागत केले.
मोदींनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मोदी आणि शरीफ विशेष हॅलिकॉप्टरने शरीफ यांच्या लाहोर येथील निवासस्थानी गेले. तेथे दोन्ही नेत्यांनी तासभरापेक्षा जास्तवेळ चर्चा केली. मोदी यांच्या नातीचा आज विवाह असल्याने त्यांचे लाहोर येथील निवासस्थान रोषणाईने सजले होते. मोदी यांच्यासाठी खास चहा आणि काश्मिरी चहाचा मेन्यू ठेवण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवाझ शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी दूरध्वनी केला तेव्हा पाकिस्तान भेटीचा कार्यक्रम ठरला असे सूत्रांनी सांगितले. मोदी याची भेट उत्सफूर्त असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अफगाणिस्तानातून परतताना पाकिस्तानात थांबणार असल्याचे टि्वटरवरुन जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. व्दिपक्षीय चर्चेचे समर्थन करणा-यांनी मोदी यांच्या दौ-याचे स्वागत केले मात्र काँग्रेस आणि मित्रपक्ष शिवसेनेने या भेटीवर बोचरी टीका केली.
दोन दिवसांच्या रशिया दौ-यानंतर अफगाणिस्तानला गेलेले मोदी आज भारतात परतणार आहेत. अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ते भारतात आल्यावर देणार आहेत. परंतु अचानक मोदींनी टिवटरच्या माध्यमातून काबूलहून दिल्लीला येताना वाटेत लाहोरला उतरणार असल्याचे आणि नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असल्याचे जाहीर करुन, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊन आल्या असून भारत पाक संबंध सुधारत असल्याचे व खंड पडलेली द्विपक्षीय बोलणी पुन्हा सुरू होत असल्याचे संकेत आहेत. त्यामागोमाग मोदींच्या या अचानक भेटीमुळे भारत पाक संबंध खरोखर सुधारत असल्याचे चित्र दिसत आहे. अन्य देशांच्या प्रमुखांशी व्यक्तिगत पातळीवर संबंध निर्माण करणं आणि ते जाहीर करणं ही मोदींची खासियत आहे. जपानचे पंतप्रधान एब यांच्याशी खास मैत्री, ओबामांचा उल्लेख माय फ्रेंड करणं किंवा अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांना यारी है इमानची साद घालणं आदी दाखले मोदींनी दिले असून त्यांच्या यादीमध्ये नवाझ शरीफपण खास मित्र बनतात की काय अशी शंका यायला वाव आहे.