केवडिया :गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला जागतिक स्तरावरील पर्यटनाशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
देशाच्या विविध भागातून एकाच ठिकाणी एकाच वेळी आठ रेल्वेसेवा सुरू करणे हे ऐतिहासिक आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचा मंत्र देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगात सर्वांत उंच असलेल्या पुतळ्याचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. केवडिया रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे आदिवासी समाजाचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा मंत्र देणारे स्थानक म्हणून केवडियाची नवीन ओळख निर्माण होईल. जागतिक स्तरावरील मोठे पर्यटन स्थळ म्हणून केवडियाचा विकास होत आहे. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी सुरू करण्यात येत असलेल्या रेल्वेचे डबे व्हिस्टाडोम प्रकारातील असल्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'मुळे केवडियामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आतापर्यंत सुमारे ५० लाख पर्यटकांनी 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' पाहिले आहे. इकॉनॉमी आणि इकॉलॉजी यांचा उत्तम मेळ घालून केवडियाचा झालेला विकास हे उत्तम उदाहरण असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
रेल्वेच्या आधुनिकीकरणामुळे अद्याप रेल्वे पोहोचली नाही, अशा ठिकाणी आता रेल्वे जाळे पोहोचणे शक्य होणार आहे. रेल्वेचे विस्तारीकरण आणि विद्युतीकरण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया रेल्वे स्थानकाचे लोकार्पण केले. तसेच ब्रॉडगेज मार्गिकेचेही उद्घाटन करण्यात आले. दादर, वाराणसी, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर येथून केवडियासाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्या आहेत.