अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथे तीन दिवसीय ग्लोबल आयुष अँड इनोव्हेशन समिटचं उद्घाटन केलं. यादरम्यान, पीएम नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस यांचं गुजरातीमध्ये नामकरणही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गमतीजमतीमध्ये सांगितले की, डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस हे माझे खूप चांगले मित्र आहेत. ते मला सांगत होते की, त्यांना भारतातील एका शिक्षकाने शिकवलं होतं. ते सांगत होते की, मी पक्का गुजराती बनलो आहे. मला गुजरातीमध्ये काहीतरी नाव ठेवा. त्यामुळे आजपासून मी माझ्या मित्राचं नामकरण तुलसी भाई असं करत आहे.
मोदी पुढे म्हणाले की, आयुषच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशनची अपार संधी आहे. २०१४ मध्ये आयुष सेक्टर तीन बिलियन डॉलरपेक्षा लहान होतं. मात्र आज ते वाढून १८ बिलियन डॉलरच्या पुढे पोहोचले आहे. आयुष औषधे, सप्लिमेंट्स आणि कॉस्मेटिक्सच्या उत्पादनामध्ये आम्ही अभूतपूर्व वाढ पाहत आहोत. आयुष मंत्रालयाने ट्रे़डिशनल मेडिसिन्समध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेद कडून विकसित एक इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आले आहे.
स्टार्टअपबाबत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, भारतामध्ये सध्या युनिकॉर्न्सचं युग सुरू आहे. सन २०२२ मध्ये आतापर्यंत भारताच्या १४ स्टार्ट-अप्स, युनिकॉर्न्स क्लबशी जोडले गेले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, लवकरच आयुषच्या आमच्या स्टार्ट अप्समधूनही युनिकॉर्न्स समोर येतील.