श्रीनगर- आज सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. सगळीकडेच दिवाळीसाठी विशेष तयारी असून आनंदाने दिवाळीचा सण साजरा केला जातो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी सकाळी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुरेजमध्ये पोहचले. मोदींनी जवानांसह दिवाळी साजरी केली. दोन तास मोदी सीमेवरील जवानांबरोबर होते. मोदींनी जवानांना दिवाळीनिमित्त खास मिठाई दिली तसंच ग्रीटिंग कार्डही दिले.
सीमेवर लढणारे जवान हे माझं कुटुंबीय आहे. त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्याची इच्छा होती. म्हणून इथे आल्याचं मोदींनी यावेळी म्हंटलं. जवानांबरोबर वेळ घालविल्यावर नवी ऊर्जा मिळते, असंही मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठीण प्रसंगी जवान करत असलेल्या कामगिरीचं कौतुक केलं.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी २०१४ मध्ये सियाचिनमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. २०१५च्या दिवाळीत ते डोगराई वॉर मेमोरियल येथे गेले होते. तर गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथील चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. यंदा ते उत्तर काश्मीरमधील गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरा करणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटवरून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सगळ्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा. दुसऱ्याच्या प्रती संवेदना आणि पर्यावरणाबद्दलची जागृकता ठेवून दिपोत्सव साजरा करा, असं ट्विट रामनाथ कोविंद यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सीमेवरील जवानांबरोबर मोदींची दिवाळीपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सीमेवर पोहचले आहेत. गुरूवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या गुरेजमध्ये मोदी पोहचले. श्रीनगर एअरपोर्टवर गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता मोदी दाखल झाले. तेथून ते गुरेजला रवाना झाले. मोदी यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावतही आहेत.