नवी दिल्ली - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते हुतात्मा स्मारक इथं अभिवादन करत आहे. विविध स्तरातून महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत ट्विट करत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की, महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा असं त्यांनी म्हटलं आहे.
तर शौर्य, वारसा आणि आध्यात्मिक पुनर्जागरणाची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त मी राज्यातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान अमूल्य आहे. 'विकसित भारत' घडवण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल. या निमित्ताने राज्यातील तमाम जनतेच्या प्रगती आणि भरभराटीसाठी मी शुभेच्छा देतो असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले आहे.
समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू - राज्यपाल
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.