रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:54 PM2023-12-07T14:54:21+5:302023-12-07T14:57:45+5:30
काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत खलबतं सुरू होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाने रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि अखेर आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणनू तर इतर ११ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रेड्डी यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच तेलंगणाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या रेवंत रेड्डी यांचं अभिनंदन. राज्याचा विकास करण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे कल्याण करण्यासाठी शक्य असलेले सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास मी देतो."
Congratulations to Shri Revanth Reddy Garu on taking oath as the Chief Minister of Telangana. I assure all possible support to further the progress of the state and the welfare of its citizens. @revanth_anumula
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2023
स्टेडियमवर पार पडला शपथविधी सोहळा
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमधील आपली सत्ता गमवावी लागली. तसंच मध्य प्रदेशातही सत्ता खेचून आणण्यात पक्षाला यश आलं नाही. मात्र केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला अस्मान दाखवत तेलंगणात मात्र काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत खलबतं सुरू होती. प्रदेशाध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षातील एका गटाचा रेड्डी यांच्या नावाला विरोध होता. हा विरोध डावलून काँग्रेस नेतृत्वाने रेवंत रेड्डी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं आणि तेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. त्यानंतर आज हैदराबादच्या एल. बी. स्टेडियमवर भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
देशभरातील प्रमुख काँग्रेस नेते आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फुलांनी सजवलेल्या जीपमधून रेवंत रेड्डी यांचं मैदानावर आगमन झालं. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हेही उपस्थित होते.