नवी दिल्ली: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील, असं मोदींनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.