Balasore Train Accident । ओडिशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील रेल्वेअपघाताची घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली. ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. मोदींनी शनिवारी NDRF च्या जवानांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर जखमी प्रवाशांची रूग्णालयात भेट घेतली. "अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल", अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जखमींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
"हा मोठा अपघात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ओडिशा सरकार आणि येथील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर करून जे काही करता येईल ते केलं. जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल यासाठी येथील स्थानिकांनी पुढाकार घेतला. रक्तदान असो अथवा बचावकार्य. यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक तरूणांचा मी आभारी आहे", असं मोदींनी सांगितलं.
मोदींनी स्थानिकांचं मानलं आभार रूग्णालयात जाऊन मी जखमींशी भेट घेतली, पण याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी ईश्वराकडं प्रार्थना करतो की, या दु:खाच्या घडीतून सावरण्याची शक्ती आम्हाला दे. अपघात झाल्यावर ज्या हातांनी मदत केली त्यांचाही मी आभारी आहे, असं मोदींनी अधिक सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरून कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले. पीडितांना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरूणाईचा मदतीचा हात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.