नवी दिल्ली - त्रिपुरामधील ऐतिहासिक विजय साजरा करताना तिथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीमुळे आणि देशाच्या इतर भागात झालेल्या पुतळा विटंबनेच्या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्विग्न झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना संपर्क साधून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे प्रकार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याच्या सूचना केल्यात. भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला हा इशाराच मानला जातोय.
त्रिपुरा येथे लेनिन यांचा पुतळा पाडल्याची घटना ताजी असतानाच आता कोलकात्यामध्ये भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेकही झाली. पुतळ्याला काळे देखील फासण्यात आले. यात पुतळ्याचे नुकसान झाले आहे. शिवाय, या घटनेमुळे कोलकात्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाने या घटनेचा निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांच्या सूचनेनंतर गृहखात्याने सर्व राज्य सरकारांना खबरदारीचे निर्देश दिलेत. पुतळे पाडण्याच्या, विटंबनेच्या घटनांसह जातीय तेढ निर्माण होईल अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
त्रिपुरात जमावाने लेनिन यांचा आणखी एक पुतळा पाडला
मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकला तर या घटनेच्या दुस-याच दिवशी एका जमावाने सबरुम तालुक्यात लेनिन यांचा आखणी एक पुतळा पाडून टाकला आहे. या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागात हिंसाचार उसळला आहे. काही भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अनेक ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कार्यालये तसेच कार्यकर्त्यांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्रिपुरातील माकपचे जिल्हा सचिव तापस दत्ता म्हणाले की, राज्यात बेलोनियामध्ये कॉलेज स्क्वेअरमध्ये असलेला लेनिन यांचा पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनी पाडून टाकला. काही महिन्यांपूर्वीच पॉलिट ब्यूरोचे सदस्य प्रकाश करात यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंचक इप्पर यांनी सांगितले की, जेसीबी मशीनच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. हा पुतळा महापालिकेने ताब्यात घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल तथागत राय आणि डीजीपी ए. के. शुक्ला यांच्याशी चर्चा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा केली आहे. त्यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.भाजपाने केला उलटा आरोपमाकपमधून भाजपामध्ये आलेल्या अज्ञात लोकांनी हा हिंसाचार केला, असा दावा भाजपाचे उपाध्यक्ष सुबल भौमिक यांनी केला. माकप कार्यकर्त्यांनीच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले, असा आरोपही त्यांनी केला.विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात गरज नाही : अहिरसर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सरकार निषेध करत आहे. मात्र विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात मुळात गरजच नाही. भारतात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीन दयाल उपाध्याय व राम मनोहर लोहिया यांच्यासारखे बरेच थोर आदर्श आणि विचारवंत होऊन गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.माकप कार्यालये फोडलीमाकपची त्रिपुरातील १३४ कार्यालये फोडून आतील सामान लुटले आहे. ६४ कार्यालयांना आगी लावल्या आणि सुमारे ९0 संघटनांच्या कार्यालयांचा ताबा भाजपा व आयपीएफटीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, असे माकपचे नेते बिजन धर यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या ५१४ कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, कार्यकर्त्यांच्या १५३९ घरांची नासधूस तर १९६ कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. हिंसाचारानंतर श्रीनगर, लेफुंगाख, मंडई, आमतली, मोहनपूरसह दक्षिण त्रिपुरात काही भागात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत.तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोडभाजपाचे चिटणीस एच. राजा आणि भाजयुमो तमिळनाडू शाखेचे प्रमुख एस.जी. सूर्या यांनी लेनिनचा पुतळा पाडण्याचे स्वागत करताना, तामिळनाडूतील थोर समाजसुधारक ई.व्ही. रामस्वामी पेरियार यांचा ‘जातीय राजकारणाचे शिरोमणी’ असा उल्लेख करून त्यांचेही पुतळे पाडले जायला हवेत, असे सूचित केल्यानंतर काही तासांतच वेल्लूर येथील पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा तिरुपत्तूर महापालिकेच्या कार्यालयात होता़ याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे़ दोघेही दारूच्या नशेत होते असे समजते़ यावरून द्रविडी पक्ष आणि दलितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजा यांना अटकेची मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली. दलित नेते थोल तिरुमवलवन यांनी राजा यांना सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप केला. हा वाद अंगलट येत असल्याचे दिसताच स्वत: एच. राजा यांनी टिष्ट्वट मागे घेतले व ते त्यांचे व्यक्तिगत मत होते, असे सांगत तमिळनाडू भाजपा अध्यक्ष तमिलीसाई सुंदरराजन यांनी वादातून पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.