नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची बैठक मंगळवारी संसदेच्या लायब्रेरी बिल्डींगमध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना समाजसेवा करण्याचा सल्ला दिला तसेच मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.
मंत्रालयाच्या कार्यालयात मंत्री उपस्थित राहत नाही त्यावरुन विरोधी पक्षाची तक्रार आहे. जे मंत्री कार्यालयीन वेळेत मंत्रालयात गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची नावे मागविली असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिली.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं. दुर्गम भागातील पसरणाऱ्या आजारावर खासदाराने काम करणं गरजेचे आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान मंत्री कार्यालयात उपस्थित राहत नाही यावरुन पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त करत जे मंत्री कार्यालयात नेहमी गैरहजर राहतील अशा मंत्र्यांची नावे मला द्यावीत. मला सगळ्यांना बरोबर करता येते. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तास ड्युटी असते तरीही अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. त्याबद्दल विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच खासदारांनीही अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं सक्तीचं आहे असं त्यांनी सांगितले.
मागील संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी खासदारांना सुनावले होते. चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे.
लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला होता. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले होते.