दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. जगातील सर्वात मोठा आणि चीनला शह देणारा अटल बोगद्याचे आज पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जवळपास 9 किमी लांबीचा आणि 10000 फुटांहून अधिक उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.
या बोगद्याच्या उद्घाटनाला सीडीएस जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते.
जाणून घ्या या बोगद्याची वैशिष्ट्ये...हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या टनेलमुळे आता 12 ही महिने हा प्रदेश संपर्कात राहणार आहे. हा टनेल बांधण्य़ाचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 2000 मध्ये घेतला होता. मनाली आणि लेहचे अंतरही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. डोंगररांगांचा, घाटाचा 46 किमीचा रस्ता कमी झाला आहे. मनाली ते लेह हे 474 किमीचे अंतर या बोगद्यामुळे 428 किमी होणार आहे. हा बोगदा खोदताना कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. घोड्याच्या नालेसारखा या बोगद्याचा आकार आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजुसाठी दोन वेगवेगळे बोगदे आहेत. प्रत्येक बाजुला सिंगल टयूब असून डबल लेन आहे. 10.5 मीटरची रुंदीचा हा बोगदा आहे. मुख्य बोगद्यामध्ये 3.6 x 2.25 मीटरचा आगरोधक इमरजन्सी टनल बनविण्यात आला आहे. 10000 फुटांवरील या बोगद्याला बनविण्यासाठी 10 वर्षे लागली.
दररोज 3000 कार आणि 1500 ट्रकची वाहतूक झेलण्याची क्षमता या टनलमध्ये आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशन (BRO) ने बांधला आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि टालंग ला असे पास आहेत. बर्फवृष्टीमध्ये येथे जाणे कठीण असते. आधी मनालीपासून सिस्सू पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते. आता हे अंतर काही मिनिटांवर आले आहे. अटल टनेलच्या शेवटच्या 400 मीटरसाठी स्पीड लिमिट 40 किमी आहे. उर्वरित अंतरासाठी 80 किमी प्रति तास वेग ठेवण्यात आला आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडावर प्रवेश करण्याआधी अडथळे लावण्यात आलेले असणार आहेत. तर प्रत्येक 150 मीटरवर टेलिफोन ठेवण्यात येणार आहेत.
बोगद्यामध्ये प्रत्येक 60 मीटरवर फायर हायड्रेंट तंत्रज्ञान आहे, आग लागल्यास लगेचच नियंत्रण मिळविण्याची व्यवस्था आहे. 250 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरा असून ते ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन करतात. प्रत्येक किमीवर हवेची गुणवत्ता तपासणी आणि शुद्ध हवा आत घेण्याची सुविधा आहे. प्रत्येक 25 मीटरवर सूचना लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण टनेल ब्रॉडकास्टिंग सिस्टिमने लेस आहे.