नवी दिल्ली : देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर आहेत. योग्य वेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी रोखठोक मते लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी प्रसिद्ध अँकर आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी केलेल्या दिलखुलास चर्चेत मंगळवारी येथे मांडली.
प्रश्न : वेगळा विदर्भ बनेल, असे अजूनही वाटते की विदर्भाला आता महाराष्ट्रातच राहावे लागणार? डॉ. दर्डा : उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन छोट्या राज्यांच्या निर्मितीची घोषणा झाली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राजकीय निर्णय घेताना शिवसेनेपुढे नमते घेतले. योग्य वेळ येईल तेव्हा विदर्भ राज्य बनेल. आज ना उद्या त्यावर भूमिका घ्यावीच लागेल.
प्रश्न : २०२४ साली पंतप्रधान मोदी हॅटट्रिक नोंदवून पुन्हा सत्तेत येतील, का? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत काय होईल असे वाटते?डॉ. दर्डा : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच फ्रंटरनर आहेत. महाराष्ट्रात काय होईल यावर आज भाष्य करणे अतिशय कठीण आहे. शिवसेना सोडून आमदार का गेले, काँग्रेसमधून बडे नेते सोडून का गेले, यावर चिंतन व्हायला हवे.
प्रश्न : मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता वाटते काय?डॉ. दर्डा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यासोबतच काँग्रेसला डॉ. शशी थरुर यांच्यासारख्या तरुण, उत्साही आणि आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या नेतृत्वाचीदेखील आवश्यकता आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेली नवी ऊर्जा भरण्यास मोठी मदत होईल.