तिरुवनंतपुरम - केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत पुरामुळे 324 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री राज्यात दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यावर केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. संततधारेमुळे केरळ राज्याचे कंबरडे मोडले असून, पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. हजारो एकरातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.
केरळातील आपले आप्तस्वकीय सुखरुप आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया तसेच आखाती देशांसह अन्य देशांत राहणारे केरळी नागरिक सातत्याने भारतीय वृत्तवाहिन्या पाहत आहेत. केरळमधील शासकीय यंत्रणेशी संपर्क साधत आहेत.पिनराई विजयन यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही दूरध्वनीवरुन संवाद साधला. राज्यातील पुरस्थितीमुळे सुमारे अडीच लाख लोकांना तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये राहण्याची पाळी आली आहे.पेट्रोल, डिझेलचा साठा राखून ठेवण्याचे आदेशतिरुवनंतपुरम येथील पेट्रोल पंपांवर डिझेल, पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान ३ हजार डिझेल व १ हजार लिटर पेट्रोलचा साठा राखून ठेवण्यात यावा असे आदेश सरकारने दिले आहेत. वेळप्रसंगी हे इंधन मदतकार्यासाठी उपयोगात आणण्यात येईल. कोची विमानतळावरील सेवा स्थगित करण्यात आली असून रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. विविध रुग्णालयांत आॅक्सिजन सिलेंडरचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरमंडळी व रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.