Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धावर आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडत आहेत. युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं कारवाई करायला सुरुवात केली आहे. युक्रेन आणि रशियाकडून आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनच्या केवळ सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं जात असल्याचं रशियानं म्हटलं आहे. तर युक्रेननं हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक मारले गेल्याचा दावा केला आहे.
युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अजूनही २० हजाराहून अधिक नागरिक युक्रेनमध्ये आहेत. पण युद्धाला सुरुवात झाल्यामुळे युक्रेनच्या हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याची मोहिम पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसंच भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इग़र पोलिखा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उच्च स्तरिय बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनंही याबाबतचं ट्विट केलं आहे.
युक्रेनमधील परिस्थिती चिंताजनक होत जात असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्याचा आमचा प्रयत्न असून दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण वातावरण नांदावं अशीच भारताची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा काढायला हवा, असंही ते पुढे म्हणाले.
दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय बाजारावरही खूप मोठे परिणाम झाले आहेत. तर कच्च्या तेलाच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. यावरही पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि तेल मंत्रालयानं सविस्तर चर्चा केली आहे.