कोलकाता - केंद्र सरकारने अमलात आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झालेला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सविस्तर असे भाष्य केले आहे. नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणाईच्या मनात मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे. मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. असे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाताजवळील बेलूर मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी उपस्थित युवा वर्गाला संबोधित केले. यावेळी मोदींनी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, '' नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशातील तरुणाईच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे. काही जणांकडून मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे. मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये राहिलेल्या अल्पसंख्याकांना तिथे धर्माच्या आधारावर छळाचा सामना करावा लागल्यास त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, असे महात्मा गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. त्याची या कायद्याच्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली आहे. आता आपल्या देशात शरणागत म्हणून आलेल्या निर्वासितांना पुन्हा मृत्यूच्या डाढेत ढकलायचे का?''
''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकत्व देत आहोत. कुणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही आहोत. त्याशिवाय आजही कुठल्याही धर्माची व्यक्ती मग तिचा देवावर विश्वास असो वा नसो तिचा भारताच्या घटनेवर निश्वास असेल, तर अशी व्यक्ती योग्य प्रक्रियेद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते,''असेही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.
यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे पूर्वोत्तर भारतावर परिणाम होणार असल्याच्या व्यक्त करण्यात आलेल्या शंकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिले. पूर्वोत्तर भारतातील संस्कृती आणि परंपरेबाबत आम्हाला अभिमान आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा पूर्वोत्तर भारतालील संस्कृती आणि परंपरांवर कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी तरतूद करण्याल आली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काही जणांकडून मुद्दामहून संभ्रम निर्माण केला जात आहे. आता मी जेकाही सांगितले ते लहान लहान विद्यार्थ्यांनाही समजले. मात्र आपल्याकडी काही समजूतदार व्यक्ती मात्र ते समजून घेऊ इच्छीत नाहीत. आता हे संभ्रम दूर करण्याचे काम तरुण वर्गच करणार आहे. पाकिस्तानमध्ये इतर धर्माच्या लोकांवर अत्याचार होतो, त्याविरोधात आमची तरुणाईच आवाज उठवत आहे. आम्ही जर हा कायदा आणला नसता तर विवाद झाला नसता आणि विवाद झाला नसता तर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार उजेडात आले नसते. त्यामुळे आता पाकिस्तानला जगाला उत्तर द्यावे लागेल,'' असेही मोदी म्हणाले.