तिरुतिरापल्ली : तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका गावात तीन दिवसांपासून बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुजीत विल्सन असे या चिमुकल्याचे नाव असून त्याची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली आहे.
नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्विट केले असून तामिळनाडूनचे मुख्यमंत्री यांच्यासोबत रेस्क्यू ऑपरेशनबाबत चर्चा केली आहे. सुजीतला बोअरवेलमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले आहे.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजीत बोरवेलमध्ये पडला आणि ३० फूट खोल अडकला. ही घटना तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनाप्पाराई येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुजीतला बोअरवेलमधून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, बचावकार्य सुरु असताना रविवारी तामिळनाडुचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी घटनास्थळी भेट दिली. राज्य सरकार बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहे.