नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले. नरेंद्र मोदी सर्वप्रथम राजघाटवर पोहोचले. महात्मा गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते. मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे उपस्थित राहणार आहेत. आपल्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी मोदींनी मंगळवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा केली. नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार असून, या समारंभाचे निमंत्रण 6500 जणांना देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळात जेटली नाहीत; शहा येण्याची शक्यता, आज शपथविधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपणास मंत्री करू नये, अशी विनंती मोदी यांनी बुधवारी केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पद व खाते कायम राहील. सुषमा स्वराज यांना मंत्री होण्याची इच्छा नसल्यास, परराष्ट्र खाते निर्मला सीतारामन यांना मिळेल, असे समजते. पीयूष गोयल यांचा समावेश निश्चित आहे. जेटली यांनी आपली प्रकृती सुधारल्यानंतर काम करू शकू, असे म्हटले आहे. 60 ते 70 जणांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान या राज्यांतून मिळून सर्वाधिक मंत्री असतील, असा अंदाज आहे. शिवसेना, जनता दल (यू), अकाली दल, अपना दल, लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी, अण्णाद्रमुक यांनाही स्थान द्यायचे असल्याने भाजपाच्या मंत्र्यांची संख्या कदाचित कमी असू शकेल.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला 6,500 पाहुणे राहणार उपस्थितनरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार असून, या समारंभाचे निमंत्रण 6,500 जणांना देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये परदेशी पाहुणे, विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, भाजपसह जवळपास सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, संभाव्य मंत्र्यांचे नातेवाईक, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचा समावेश आहे. यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निमंत्रणे देण्यात आली आहेत. मोदी यांच्या 2014 च्या शपथविधी समारंभाला 5 हजार जणांना बोलावण्यात आले होते. समारंभ संध्याकाळी असल्याने, त्यानंतर भोजनाचाही कार्यक्रम आहे. त्यात भारताच्या सर्व राज्यांची वैशिष्ट्ये असलेले शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ असतील, असे सांगण्यात आले.
शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार आणि शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. अरविंद सावंत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई मतदारसंघात पराभूत केलं. गेल्या निवडणुकीतही त्यांनी देवरांचा पराभव केला होता. अरविंद सावंत यांनी गेल्या टर्ममध्ये एक अभासू खासदार म्हणून ठसा उमटवला होता. त्यांची संसदेतील भाषणेदेखील गाजली होती. विशेष म्हणजे अरविंद सावंत हे मातोश्रीच्या जवळचे समजले जातात.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. हा घटनात्मक कार्यक्रम असून, त्यास हजर राहायलाच हवे. तसे आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सांगितले आहे, असे त्या म्हणाल्या होत्या, पण हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आल्याचे कळताच, त्यांनी आपला निर्णय बदलला. आपण शपथविधीला जाणार नाही, असे सांगताना, अशा समारंभाचा भाजपा राजकीय स्वार्थासाठी वापर करीत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.