नवी दिल्ली - राज्यसभेच्या ५६ खासदारांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं भरभरून कौतुक केले. त्याचसोबत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होणार आहे. लवकरच या जागांसाठी निवडणूक होईल. मात्र विद्यमान ५६ खासदार यांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहातून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दर २ वर्षांनी या सभागृहात असा प्रसंग येतो. हे सभागृह निरंतर आहे. लोकसभा दर ५ वर्षांनी नव्याने स्थापन होते. मात्र राज्यसभा दर २ वर्षांनी नवीन उर्जा, उमंग, उत्साह निर्माण करतो. हा निरोप नाही तर अशा आठवणी कायम ठेऊन जातात त्या पुढील पिढीसाठी अमुल्य वारसा असतो. काही लोक जातायेत, काहीजण पुन्हा येण्यासाठी जातायेत. मला विशेषरित्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मला आठवण येते. ६ वेळा या सभागृहात आपल्या विचारांनी नेते, विरोधी पक्षनेते त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. वैचारिक मतभेद कधी वादविवाद हे अल्पकालीन असते. परंतु एवढा दिर्घकाळ ज्यारितीने त्यांनी सभागृहाचे आणि देशाचे मार्गदर्शन केले. जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच मी सर्व सदस्यांना, मग ते लोकसभा, राज्यसभा असो. त्यांना सांगतो, हे खासदार कुठल्याही पक्षाचे असो. ज्यारितीने त्यांनी आयुष्य खर्ची घातली. त्यांच्या कौशल्याचे दर्शन त्यांच्या कारकिर्दीत दाखवले. त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. लोकसभेत एकदा मतदानावेळी विजय विरोधकांचा होणार हे माहिती होते. मतांचे अंतरही जास्त होते. परंतु डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले त्यांनी मतदान केले. एक खासदार त्यांच्या जबाबदारीबाबत किती सजग असायला हवा त्याचे हे उदाहरण आहे. जेव्हा कमिटीची निवडणूक होती तेव्हाही ते व्हीलचेअर मतदान करायला आले. ते कुणाला ताकद द्यायला आले हा प्रश्न नाही. परंतु ते लोकशाहीला ताकद द्यायला आले होते. त्यामुळे मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
दरम्यान, जे आपले सहकारी नवीन जबाबदारी घ्यायला पुढे जातायेत. राज्यसभेतून जनसभेकडे जाणार आहेत. कोविडच्या कठीण काळातही प्रत्येकाने परिस्थितीची जाणीव ठेवली. जिथे बसायला सांगितले तिथे बसले. परंतु देशाचं कामकाज थांबू दिले नाही. या खासदारांनी जुने संसद आणि नवीन संसद दोन्ही पाहिले. एका विद्यापीठातून शिकून मुले बाहेर येऊन समृद्ध बनतात तसं गेल्या ६ वर्षाच्या काळात हे खासदार समृद्ध होऊन बाहेर चालले आहेत असंही मोदींनी सांगितले.