मुंबई, दि.2- भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहलं आहे. या पत्रातून युवराज सिंगचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. युवराज सिंगच्या युवीकॅन (youwecan) फाऊंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याबद्दल त्याचं आणि एनजीओचं या पत्रातून कौतुक करण्यात आलं आहे.
भारताचा स्टार प्लेअर युवराज सिंग युवीकॅन (youwecan) नावाची एनजीओ चालवतो. युवीकॅन (youwecan) एनजीओच्या माध्यमातून कर्करोगाविषयी आणि कर्करोगाशी लढण्यासाठी जनजागृती करण्याचं काम केलं जातं. युवराज सिंगने ही एनजीओ जुलै 2012मध्ये सुरू केली होती. 'युवराज सिंग आणि त्याची संस्था युवीकॅन उत्तम काम करते आहे',असं मोदींनी युवराज सिंगला लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे.
'प्रिय युवराज, तुमचं पत्र मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. सामाजिक कार्याची तुम्हाला असणारी ओढ आणि तुमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामाबद्दल समजल्यावर खूप आनंद झाला. एक उत्तम क्रिकेटर आणि कर्करोगावर मात करणाऱ्या तुमच्याकडून भारतीय लोक प्रेरणा घेत आहेत. अशाच उत्साहाने समाजाची सेवा करत रहा', असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवराज सिंगला लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे.
युवराज सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह हे पत्र शेअर केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रोत्साहन करणारं पत्र मिळणं सगळ्यांसाठीच सन्मानाची गोष्टी आहे. युवीकॅनच्या माध्यमातून सगळे एकत्र मिळून दुनिया बदलू शकू, असा आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला जे मिळालं आहे आणि तुम्ही जे करता यामुळे फरक पडतो. एखाद्याचं आयुष्य चांगलं करणं आणि दुनियेत बदल घडविण्यासारखा दुसरा मोठा सन्मान नाही, असं युवराज सिंगने म्हंटलं आहे.