पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केलं. याशिवाय त्यांनी शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त (Guru Tegh Bahadur Parkash Purab) टपाल तिकिटही जारी केलं. “आज मला गुरूंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि याला मी गुरूंची माझ्यावर असलेली कृपा मानतो,” असं मोदी यावेळी म्हणाले.
“आज आपला देश संपूर्ण निष्ठेने आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरूंना नमन करतो. तसंच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरूवाणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो,” असं मोदी यावेळी म्हणाले. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
“भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नवीन विचार, सतत मेहनत आणि समर्पण ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हाच देशाचा हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिक गोष्टींवर अभिमान असायला हवा आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला निर्माण करायचा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी मोदींनी २०१८ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा केला होता. त्यावेळी, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तर, सकाळी ९ वाजता त्यांनी भाषण केले होते.