भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ट्विटरवर टॅग करत आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर असल्याचं म्हणतं पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रिजिजूंचं कौतुक केलं आहे. अरुणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.
अरुणाचल प्रदेशातील काजलंग गावात मिजी जमातीच्या कार्यक्रमात किरेन रिजिजू सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत पारंपरिक नृत्याने करण्यात आले. त्यावेळी रिजिजू यांनी देखील संगीतावर ताल धरत आपलं नृत्यकौशल्य दाखवून दिलं. या गावातील काही प्रकल्पांना भेट देत असताना ग्रामस्थांनी केलेल्या आदरातिथ्यानं आपण भारावून गेल्याचं रिजिजू म्हणाले.
पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात नृत्य करणाऱ्या कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या या व्हिडिओचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं आहे. आपले कायदामंत्री एक उत्तम डान्सर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिजिजू यांनी ट्विट केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या गौरवशाली संस्कृतीचं कौतुकही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.