अहमदाबाद, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या नवीन प्रकल्पामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या तीन तासांत कापणं शक्य होणार आहे. हा प्रकल्प 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा आहे व 2022पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बुलेट ट्रेन भारताला जवळपास मोफतच मिळाली आहे. या प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे मोदींनी आभारही मानले.
मोफत बुलेट ट्रेनचा फंडा समजावून सांगताना मोदी म्हणाले की, 'एखादी व्यक्ती विशेषः अहमदाबादकर कोणतीही वस्तू खरेदी करते, तेव्हा ती प्रत्येक पैशांचा हिशेब मांडतात. एखाद्याला दुचाकी खरेदी करायची असेल, तरीही तो 10 बँकांमध्ये जाऊन व्याजाचे दर कुठे कमी आहेत, याची चौकशी करतो. अर्धा टक्का कमी दराने कर्ज मिळाल्यावरही त्याला आनंद होतो,' असे मोदी यांनी यावेळी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, जपानकडून या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 88 हजार कोटींचं कर्ज मिळाले आहे. जपाननं भारताला केवळ 0.01 टक्के दराने कर्ज दिले आहे. असे कर्ज कोणता मित्र देईल? मात्र भारताला शिंजो आबे यांच्यासारखा मित्र मिळाला आहे, असे सांगत मोदी यांनी बुलेट ट्रेनमागील कर्जाचा फंडा समजावून सांगितला.
'जय जपान, जय इंडिया'चा नारादरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलेल्या भाषणात आबे यांनी भारत आणि जपानच्या मैत्रीला एक उत्तम उदाहरण सांगत एक नवीन नारा देखील दिला. ते म्हणाले की, जपानचा 'ज' आणि इंडियाचा 'आय' हे अक्षरं मिळून जय शब्द तयार होते म्हणजे विजय होते. 'जय जपान, जय इंडिया'ला साकार करण्यासाठी दोन्ही एकत्र मिळून काम करतील
'पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते' आपल्या भाषणामध्ये शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही भरभरुन कौतुक केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत', अशा शब्दांत शिंजो आबे यांनी मोदींचं कौतुक केले. '10 वर्षांपूर्वी मला भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे संबंध म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा संगम आहेत. माझे मित्र पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते असून बुलेट ट्रेनचे स्वप्न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे,’ असेही आबे म्हणालेत.
जाणून घेऊया मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे.
2. या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.
3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल.
4. तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल
5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे. 6. 1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे.
7. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील.
8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.
9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे.
10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.