नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राज्यसभेमध्ये काँग्रेसवर कडाडून हल्ला केला. काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधींनी म्हटले हाेते. काँग्रेस नसती तर ही लाेकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. आणीबाणीचा कलंक लागला नसता, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान माेदी यांनी काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला.माेदी म्हणाले, की काँग्रेस विसर्जित झाली असती तर लाेकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. देशात जातीयवाद राहिला नसता. शिखांचे हत्याकांड झाले नसते, दहशतवादही राहिला नसता. काश्मिरी पंडितांना काश्मीर साेडावे लागले नसते.
जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांना नाेकरीवरून काढले हाेते... -माेदी म्हणाले की, वीर सावरकर यांची देशभक्तीपर कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध करून रेडिओवरून प्रस्तुत केली हाेती. त्यावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून नाेकरीतून काढले हाेते, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केल्यामुळे गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना तुरुंगात टाकण्यात आले हाेते.
महागाई नियंत्रणात -माेदींनी महागाईच्या मुद्द्यावर विराेधकांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, की जगातील अनेक देशांमध्ये विकासदर मंदावला असून महागाई ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहे. त्याउलट भारतात महागाईचा दर मध्यम असून विकासदर जास्त आहे.
‘पवारांकडून काहीतरी शिका’पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे काैतुक केले. संपूर्ण मानवजातीवर संकट आले त्यावेळी काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र, पवार त्यावेळी म्हणाले, की मी जास्तीत जास्त लाेकांशी बाेलेन. त्यावेळी शरद पवार, तृणमूल काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली हाेती. शरद पवारांकडून काहीतरी शिका. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान