लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठे राजकीय वक्तव्यही केले. "जे देशाचे आहे, ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे आणि संविधानात नागरिकांसाठी जे अधिकार आहेत, ते सर्वांनाच मिळाले आहेत," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
‘जे देशाचे, ते सर्वांचे’ - पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येकाची सेवा करा, मग त्याचा धर्म अथवा जात कुठलीही असो, असा संदेश सर सय्यद यांनी दिला आहे. याच प्रकारे, देशाला समृद्ध करण्यासाठी त्याचा प्रत्येक पातळीवर विकास होणे आवश्यक आहे. आज प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारच्या भेद-भावाशिवाय विकासाचा फायदा मिळत आहे. तसेच, नागरिकांनी संविधानने दिलेल्या अधिकारांसंदर्भात निश्चिंत रहावे, 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'च सर्वात मोठा मंत्र आहे.
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात डिसेंबर, 2006 मध्ये झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना, ‘समाजातील सर्व मागास आणि अल्पसंख्याक वर्गाला विशेषत: मुस्लिमांना विकासाच्या लाभात बरोबरीचा वाटा निश्चित करण्यासाठी त्यांचे सशक्तिकरण करण्याची आवश्यकता आहे. देशातील संसाधनांवर पहिला अधिकार त्यांचाच आहे,’ असे म्हटले होते.
यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. नव्हे, काँग्रेस आणि तत्कालीन यूपीए सरकार मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने केला होता. एवढेच नाही, तर भाजपने दीर्घकाळ हा मद्दा उचलून धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलेले हे वक्तव्य मनमोहन सिंगांच्या वक्तव्याशी जोडले जात आहे. लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदी हे अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेणारे दुसरेच पंतप्रधान आहेत.
राजकारणापेक्षा समाज मोठा - पंतप्रधान मोदी म्हणाले, समाजात मतभेत असतात. मात्र, देशाच्या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्व मतभेद बाजूला सारायला हवेत. देशात कुणीही कुठल्याही जाती अथवा धर्माचा असो, त्याने देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. मोदी म्हणाले, AMUमधून अनेक सेनानी बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांच्या विचाराला बाजूला सारत आपल्या देशासाठी लढा दिला. ते म्हणाले, राजकारण हे समाजाचे केवळ एक अंग आहे. मात्र, राजकारण आणि सत्तेपेक्षा देशातील समाज अधिक महत्वाचा असतो.