नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया गेट लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या हुनर हाट ला भेट दिली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रदर्शनाला अचानक भेट दिल्याने तिथे उपस्थित असलेले कारागिर आणि सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मोदींनी तिथे असलेल्या स्टॉल्सना भेट दिली. तसेच तिथे उपस्थित असलेले कारागिर आणि सर्वसामान्यांशी चर्चा केली. यादरम्यान, मोदींनी कुल्हडमधील चहाचा आणि बिहारमधील खास अशा लिट्टी-चोखाचा आस्वाद घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक भेट दिल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मात्र सर्वसामान्यांना पंतप्रधानांची भेट घेण्याची परवानगी होती. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हेसुद्धा उपस्थित होते. कौशल को काम या थीमवर आधारित या प्रदर्शनात देशभरातील दस्तकार, शिल्पकार आणि आचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.
गत तीन वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून सुमारे ३ लाख दस्तकार, शिल्पकार आणि आचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी येथील प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत.