ऑनलाइन लोकमत
उत्तराखंड, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (3 मे ) केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर आर्मी बँडकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी तेथील उपस्थित भाविकांचीही भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पूर्व द्वारातून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील गाभा-यात रुद्राभिषेकही केला. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी येथे तब्बल एक तास पूजाअर्चना केली.
पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी याठिकाणी पहिल्यांदाच भेट दिली आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसाठीही केदारनाथ मंदिर दर्शनासाठी बुधवारपासून खुले झाले आहे. बुधवारी सकाळी 8.50 वाजण्याच्या सुमारास मंदिराचे दार उघडण्यात आले. पंतप्रधान मोदींची पूर्जाअर्चना झाल्यानंतर केदारनाथ मंदिर प्रशासनाकडून मंदिराची प्रतिकृती भेट स्वरुपात देण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी या दौ-याची माहिती एक दिवसआधी ट्विट करुन दिली होती. पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली होती. मंदिरापासून काही अंतरावर हेलिपॅडही बनवण्यात आले होते. तर मंदिराची फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती.
पंतजली रिसर्च इन्स्टिट्यूचे उद्घाटन
केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांची भेट घेणार आहेत. यानंतर दुपारी ते हरिद्वार येथे पंतजली रिसर्च इन्स्टिट्यूचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर संध्याकाळी ते दिल्लीसाठी रवाना होतील.
केदारनाथ मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तिसरे पंतप्रधान आहेत. या आधी इंदिरा गांधी, व्ही.पी सिंह देखील पंतप्रधान असताना त्यांनी देखील केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यानंतर 5 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीदेखील उत्तराखंड दौ-यावर असणार आहेत. या दौ-यावेळी मुखर्जी केदारनाथव्यतिरिक्त ब्रदीनाथ येथेही भेट देणार आहेत.