कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर आयआयटीच्या दीक्षांत समारंभाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला उडडाण करण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांना रस्ते मार्गेच लखनऊला जावे लागले आहे. लखनऊला दिल्लीहून विशेष विमान मागविण्यात आले असून तेथून मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.
कानपूरमध्ये खराब दृष्यमानतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मोदी हे आयआयटीच्या 54 व्या दीक्षांत समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी तरुणांना आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक भारताच्या निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. येत्या 25 वर्षांतील देशाची धुरा तुम्हालाच सांभाळायची आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ब्लॉकचेन आधारित डिजिटल डिग्री देण्यास सुरुवात केली आहे.
कानपूरमध्ये हवामान अत्यंत खराब झाले आहे. यामुळे मोदी यांचे विमान दिल्लीला जाण्यास अडचण आली. खराब हवामानामुळे त्याच्या विमानाला उड्डाण भरण्यासाठी क्लिअरन्स मिळाला नाही. यामुळे पंतप्रधानांचा ताफा रस्ते मार्गे कानपूरहून लखनऊला रवाना झाला.