नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात ते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांनी तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे.
वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या शहरांना मोदी भेटी देणार आहेत. अफगाणिस्तानातील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये मोदी यांनी अमेरिकेला भेट देऊन तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम केला होता.