मेदिनीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (5 जानेवारी) झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सभा होणार आहे. मात्र या सभेत काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे आणि काळ्या रंगाच्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. झारखंड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असतील त्यांना ओळखपत्र देखील बंधनकारक करण्यात आले आहे. झारखंडमध्ये शिक्षकांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही प्रकारची काळी वस्तू किंवा काळा कपडा परिधान करून सभामंडपात कुणी आला तर त्याला आता येऊ दिले जाणार नाही पोलीस अधीक्षक इंद्रजीत महाता यांनी दिली आहे. हा नियम सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही लागू आहे. शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून मोदी यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींच्या सभेत सहभागी होणाऱ्यांना काळे कपडे, स्वेटर, सॉक्स, ब्लेझर्स, बॅगा नेण्यावर आणि काळ्या रंगाचे शूज घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.