राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सोमवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी बोलत होते तेव्हा, फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही त्यांच्या सोबत लोकसभेत बसलेले होते.
यावेली राहुल गांधी म्हणाले, ''अयोध्या-फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी आपल्याला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्यासाठी 2 वेळा सर्व्हे करवला होता. सर्व्हे करणाऱ्यांनी, अयोध्येतून निवडणूक लढू नका, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. अयोध्येतील जनता पराभूत करेल. यामुळे नरेंद्र मोदी वाराणसीला गेले आणि तेथे बचावले.''
अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितलं -राहुल गांधी म्हणाले, अवधेश प्रसाद यांनी आपल्याला सांगितले की, त्यांना पहिल्या दिवसापासूनच निवडणूक जिंकण्याचा विश्वास होता. त्यांनी मला सांगितले की, लोकांची जमीन तर घेतली, पण त्यांना नुकसान भरपाई दिली नाही. ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना मंदिराच्या उद्घाटनासाठीही बोलावले नाही.
अयोध्येतील जनतेच्या मनात मोदींनी भय निर्माण केले - अवधेश प्रसाद यानी आपल्याला सांगितले की, छोट्या-छोट्या दुकानदारांचे व्यापार मोडून त्यांना रस्त्यावर आणले. उद्घाटनाला अदानी-अंबानी होते. पण अयोध्येतील कुणीच नव्हते. अयोध्येतील जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांनी भीती निर्माण केली. त्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांची घरे पाडली. मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.