७५ वर्षांचा प्रवास, ग्रुप फोटो अन् व्हिप; आजपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा रंगणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:02 AM2023-09-18T10:02:22+5:302023-09-18T10:02:42+5:30

Special Session of the Parliament: एक देश, एक निवडणूक ते महिला आरक्षण आणि इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यांवर काही विशेष सत्र देखील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prime Minister Narendra Modi will speak in Lok Sabha today at 11 AM, on the first day of the Special Session of the Parliament. | ७५ वर्षांचा प्रवास, ग्रुप फोटो अन् व्हिप; आजपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा रंगणार सामना

७५ वर्षांचा प्रवास, ग्रुप फोटो अन् व्हिप; आजपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा रंगणार सामना

googlenewsNext

नवी दिल्ली: संसदेच्या अध्यायात एका नव्या अध्यायाची भर पडणार आहे. संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता लोकसभेत बोलणार आहेत. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकार काही आश्चर्यकारक बाबी अधिवेशनात मांडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अधिवेशनात संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा होणार असून संसद नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. 

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, अधिवेशनात एकूण आठ विधेयके मांडली जातील, त्यापैकी चार विधेयके सरकारने उघड केली असून उर्वरित चार विधेयकांबाबत चर्चा सुरू आहे. विशेष अधिवेशनाबाबत अनेक दिवसांपासून राजकारण सुरू आहे. विशेष अधिवेशनापूर्वी अजेंडा जाहीर करण्याची परंपरा नसल्याचे सांगून यापूर्वी सरकारने मौन बाळगले होते, मात्र काही दिवसांपूर्वी अजेंडा सार्वजनिक करताना विशेष अधिवेशनात चार विधेयके मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी विधेयक, सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्षाचा मुद्दा कायम आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक सरकारने मांडावे आणि ते मंजूर करावे, अशी मागणी काँग्रेसने सरकारकडे केली आहे. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना पाच दिवस सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. एक देश, एक निवडणूक ते महिला आरक्षण आणि इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यांवर काही विशेष सत्र देखील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सरकार यावेळी आश्चर्यचकित करणार का, की संसदीय दौऱ्यावर सभागृहात चर्चा होऊन केवळ अजेंड्यावरील विधेयकांवरच चर्चा होणार का, हे पाहावे लागेल.

पहिल्यांदाच ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर होणार चर्चा-

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणीवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर काय साध्य झाले, यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आठ विधेयके मांडली जातील. विशेष अधिवेशनाच्या पाचही दिवशी सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सभागृहाच्या संपूर्ण कामकाजात उपस्थित राहण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

सर्व खासदारांचे ग्रुप फोटो काढले जाणार-

लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व ७९५ सदस्य (लोकसभेचे ५४५ खासदार आणि राज्यसभेचे २५० खासदार) मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सामूहिक छायाचित्रासाठी जमतील. पहिल्या फोटोत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतील. दुसऱ्या फोटोत फक्त लोकसभा सदस्य आणि तिसऱ्या फोटोमध्ये फक्त राज्यसभेचे सदस्य असणार आहे. 

संसदेचे कर्मचारी नवीन ड्रेसकोडमध्ये-

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वीच संसद कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, जो संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लागू होणार आहे. संसद भवनातील पुरुष कर्मचारी क्रीम रंगाचे जॅकेट आणि गुलाबी कमळाच्या फुलांच्या डिझाईनने सजलेली खाकी पॅंट घालतील. महिला अधिकारी गुलाबी साडीसोबत लोटस प्रिंटचा कोटही परिधान करताना दिसणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने हा ड्रेस बनवला आहे. संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या मार्शलचा पेहरावही या विशेष अधिवेशनामुळे बदलणार आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे मार्शल मणिपुरी पगडी परिधान करतील.

विरोधकांची सर्वपक्षीय बैठक- 

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक बराच वेळ चालली. ज्यामध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, द्रमुक नेते वायको, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते व्ही शिवदासन सरकारने बोलावलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचले. निवडणूक आयोगाच्या निवड प्रक्रियेत कोणताही बदल न केल्याचा मुद्दाही विरोधी पक्षांनी उपस्थित केला. याशिवाय महिला आरक्षण, जातिगणना, अदानी प्रकरण, कॅग अहवाल, मणिपूर, मेवात यासह विविध विषयांवर सभागृहात चर्चेची मागणी करण्यात आली.

Web Title: Prime Minister Narendra Modi will speak in Lok Sabha today at 11 AM, on the first day of the Special Session of the Parliament.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.