PM Narendra Modi Visit America: पंतप्रधान नरेंद्र मोदीअमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. जून महिन्यात पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा असून, याबाबत अमेरिकेच्या व्हाइट हाऊसकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत २२ जून रोजी पंतप्रधान मोदींची भेट होऊ शकते, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवांकडून सांगण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांची आगामी भेट अमेरिका आणि भारत यांच्यातील सखोल आणि घनिष्ठ भागीदारी मैत्री वाढवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे स्वतंत्र, मुक्त, समृद्ध आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी दोन्ही देशांची बांधिलकी आणखी मजबूत होईल. दोन्ही देशांचे नेते शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याच्या मार्गांवर आणि परस्पर संबंधांवरही चर्चा करतील, असे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. तसेच २२ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडन यांच्यासोबत रात्री भोजनाचा आस्वाद घेतील, असेही सांगितले जात आहे.
जो बायडन यांनी दिले होते निमंत्रण
पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याची गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना या भेटीसाठी आमंत्रित केले होते. भारताने सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या G-20 परिषदेचे यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी दोन्ही देशांच्या नेत्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. व्हाईट हाऊसच्या या घोषणेनंतर आता हा दौरा निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.