नरेंद्र मोदी उद्या केदारनाथ-बद्रीनाथ धामला भेट देणार, पंतप्रधान झाल्यानंतर सहाव्यांदा दौऱ्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:40 AM2022-10-20T11:40:51+5:302022-10-20T11:41:22+5:30
3400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी उत्तराखंड (Uttarakhand) दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) मंदिरात पूजा करण्यात येणार आहे. याशिवाय, 3400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत पाच वेळा केदारनाथला भेट दिली आहे. पंतप्रधान म्हणून ते 3 मे 2017 रोजी पहिल्यांदा केदारनाथला गेले होते. दरम्यान, यावर्षी केदारनाथ धामचे दरवाजे 27 ऑक्टोबरला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 19 नोव्हेंबरला बंद होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता केदारनाथ मंदिरात पोहोचतील आणि तेथे पूजा करतील. यानंतर ते 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. यादरम्यान नरेंद्र मोदी आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीलाही भेट देणार आहेत. तसेच, आपल्या दौऱ्यात ते मंदाकिनी आणि सरस्वती नदीच्या काठावर सुरू असलेल्या विकासकामांचाही आढावा घेणार आहेत.
यानंतर केदारनाथहून ते साडेअकरा वाजता बद्रीनाथला पोहोचतील आणि तेथे पूजा आणि दर्शन घेतील. दरम्यान, केदारनाथमध्ये बांधण्यात येणारा रोपवे 9.7 किमी लांबीचा असणार आहे. तो गौरीकुंडला केदारनाथशी जोडला जाईल. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. सध्या या प्रवासाला सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
यापूर्वी झालेले दौरे...
- 3 मे 2017 - केदारनाथ धाममध्ये दर्शन आणि पूजा.
- 19 ऑक्टोबर 2017 - केदारनाथ धाममध्ये दर्शन आणि पूजा, अनेक बांधकाम कामांची पायाभरणी.
- 7 नोव्हेंबर 2018 - 2018 च्या दिवाळीच्या दिवशी केदारनाथ धामला भेट दिली, पुनर्निर्माण कामांचा आढावा घेतला.
- 18 मे 2019 - लोकसभा 2019 ची निवडणूक प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी केदारनाथला गेले, गुहेत ध्यान केले.
- 5 नोव्हेंबर 2021 - अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी.