नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचेट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेबाबत ट्विटरने पत्रक काढून माहिती दिली आहे. यामध्ये ट्विटरने सांगितले की, आम्हाला पंतप्रधान मोदींच्या अकाउंटमध्ये गडबड झाल्याची माहिती मिळताच आम्ही त्वरित सक्रिय झालो. ट्विटर इंडियाने सांगितले की, आमच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये समजले की, सद्यस्थितीमध्ये कुठलेही संकेत मिळालेले नाहीत.
ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्याकडे पंतप्रधान कार्यालयासोबत संवाद साधण्यासाठी २४X७ लाईन सुरू असतात. आम्हाला या हॅकिंगबाबत समजले तेव्हा आमच्या टीमने सदर अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित आवश्यकती पावले उचलली. आमच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये हे अकाऊंट वगळता कुठलेही अन्य अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळालेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटरच्या अंतर्गत तपासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अकाऊंट हॅक झाल्याची घटना ही कुठल्याही सिस्टिममध्ये गडबड झाल्यामुळे झालेली नसल्यासे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत ट्विटर हँडल @narendramodi रात्री उशिरा हॅक झाले होते. रात्री दोन वाजून ११ मिनिटांनी याबाबतचे एक ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये भारताने बिटकॉईनला अधिकृतरीत्या कायदेशीर मान्यता दिली आहे. तसेच सरकारसुद्धा ५०० बिटकॉईन खरेदी करून लोकांना वाटत आहे, असे ट्विट करण्यात आले होते. दोन मिनिटांनंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र पुन्हा २ वाजून १४ मिनिटांनी याचप्रकारचे ट्विट करण्यात आले. मात्र नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. पण तोपर्यंत या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.