नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट आणि लशीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडकडीत निर्बंध लादले आहेत. या काळात गरीब जनतेला अथवा हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामेरे जावे लागत आहे. या गरीब जनतेसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार धावून आले आहे. मोदी सरकारने या 80 कोटी गरिबांना 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने'अंतर्गत दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. (Prime Minister Modi's big announcement; 80 crore poor to get free foodgrains till Diwali)
पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही मे-जूनपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना वाढविण्यात आली होती. मात्र आता ही योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांसोबत उभे आहे. या योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार गरिबांना उपाशी पोटी झोपू देणार नाही.
कोरोनाविरोधातील लढाईत लस सुरक्षा कवच -लसीकरणावर बोलताना मोदी म्हणाले, "कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे आहे. लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी आहेत. आज भारतात कंपन्या नसत्या तर काय परिस्थिती उद्भवली असती. पूर्वी लसी आणण्यासाठी दशकांचा काळ लागायचा. हेपिटायटीस, पोलिओ यांसारख्या लसीसाठी दशकांचा वेळ लागायचा. जेव्हा 2014 मध्ये आम्हाला संधी मिळाली तेव्हा लसीकरणाचे कव्हरेज 60 टक्क्यांच्या जवळ होते. ज्या प्रकारे लसीकरण सुरू होते त्याप्रमाणे 100 टक्के लसीकरणासाठी 40 वर्षे लागली असती. यासाठी आम्ही मिशन इंद्रधनुष्य सुरू केले. या अंतर्गत लसीकरण केले जाईल आणि ज्याला गरज असेल त्याला लस दिली जाईल, असे ठरवले. केवळ 7 वर्षांत कव्हरेज 60 टक्क्यांवरून 90 टक्के केले. आम्ही लसीकरणाची व्याप्ती वाढवली."
नियत, निती आणि परिश्रमानंतर फळ मिळतेच -कोरोना काळात भारताने केलेल्या कामांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जेव्हा नियत साफ असते, निती स्पष्ट असते आण, निरंतर परिश्रम एखादा देश करतो तेव्हा त्याचे फळ मिळतेच. भारताने एका वर्षाच्या आत दोन 'मेड इन इंडिया' लशी आणल्या. देशात सध्याच्या घडीला 23 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात आज जर लस निर्मिती झाली नसती तर किती मोठे संकट उभे राहिले असते याचा विचारही करवत नाही", असेही मोदी म्हणाले.