पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले. त्यांनी रेशन डीलर्स असोसिएशनसोबत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन केले. प्रह्लाद मोदी हे रेशन डीलर असोसिएसनचे अध्यक्ष आहेत. एवढेच नाही, तर ते ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर्स फेड्रेशनचे (AIFPSDF) उपाध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे इतर सदस्यही या निदर्शनात सहभागी झाले होते.
काय म्हणाले प्रह्लाद मोदी? - यावेळी प्रह्लाद मोदी म्हाणाले, AIFPSDF चे एक प्रतिनिधिमंडळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागण्या एकत्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये वाढ आणि दुकाने चालविण्यासाठी लागणारा अधिकचा खर्च अशा स्थितीत, किलोमागे केवळ 20 पैशांची वाढ, ही एक क्रूर चेष्टा आहे. यामुळे, आम्ही विनंती करतो, की केंद्र सरकारने आम्हाला दिलासा द्यावा आणि आमचे आर्थिक संकट दूर करावे.
तसेच, AIFPSDF च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल, असे प्रह्लाद मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर माझा भाऊ पंतप्रधान आहे, तर मग मी काय उपाशी मरायचे का? संबंधित मागण्यासाठी आपण असोसिएशनच्या सर्व निर्णयांसोबत उभे राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना, AIFPSDF चे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंबर बसू म्हणाले, आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याचा विचार करत आहोत. AIFPSDF तांदूळ, गहू आणि साखरेच्या झालेल्या नुकासानीबरोबरच रास्त भाव दुकानांच्या माध्यमाने पुरवठा करण्यात येणाऱ्या खाद्य तेल आणि दाळीसाठीही नुकसान भरपाईची मागणी करत आहे.
याच बरोबर, मोफत धान्य वितरणाचे 'पश्चिम बंगाल रेशन मॉडेल' संपूर्ण देशात लागू करण्यात यावे, अशी मागणीही विश्वंबर बसू यांनी केली आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरसह सर्व राज्यांसाठी देय असलेल्या सर्व मार्जिनची त्वरित परतफेड करण्यात यावी, अशी मागणीही AIFPSDF च्या सदस्यांनी केली आहे.