आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:33 AM2022-01-11T08:33:15+5:302022-01-11T08:33:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता.
उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्र सरकारसाठी उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने ८ जानेवारीला केली. त्यामुळे शनिवारपासून या पाचही राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमध्ये कोणत्याही विकासकामांची उद्घाटने वगैरे करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच सर्व उद्घाटने, प्रचारसभा वगैरेंचा सपाटा लावला होता.
१६ नोव्हेंबर ते २ जानेवारी या कालावधीत मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक भागात सभा घेतल्या. पूर्वांचलपासून पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत मोदींनी १४ प्रचारसभा घेतल्या. या सर्व प्रचारसभांमध्ये माेदींनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन वा भूमिपूजन केले. ९ जानेवारी रोजी मोदींची मोठी जाहीर सभाही होती. आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा रद्द झाली. मोदींनी मेरठमधून प्रचाराला सुरुवात केली तेथूनच निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
काँग्रेसच्या प्रियंका गांधी गेल्या वर्षभरापासून उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. मात्र, त्यांना या कालावधीत एकही मोठी सभा घेता आली नाही. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, ही मोहीम त्यांनी राबवली, तसेच प्रतिज्ञा यात्राही सुरू केली. मात्र, कोरोनामुळे त्यांनी या सर्व मोहिमा स्थगित केल्या.
समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी विजय यात्रा काढली. मात्र, एकही मोठी जाहीर सभा त्यांना घेता आली नाही. अखिलेश यांनी २५ हून अधिक ठिकाणी यात्रा काढली. त्यांना चांगला प्रतिसादही लाभला. सर्व उत्तर प्रदेशात त्यांनी प्रचार केला.
राहुल गांधी यांनी तर एकही सभा घेतलेली नाही. बसपच्या मायावती मागे राहिल्या. त्यांना एकही सभा घेता आली नाही.