मुंबई - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या सहभागी होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार उद्या दुपारी ३ वाजता महाराष्ट्राचा आढावा देत आपली बाजू मांडणार आहेत.
देशात लॉकडाउन बंद करण्याची प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी सांगितले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच, राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. वीकेंण्डलाही लॉकडाऊन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमधील इतर राज्यांतील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्हाला या लोकांसाठी क्वारंटाइनचे नियम बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सात दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 7 दिवस होम क्वारंटाइन केले जाईल. दिल्ली आणि तामिळनाडूमधून येणा-या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी आज 16 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि झारखंड अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असून येथील रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला आहे. याचबरोबर, नरेंद्र मोदी हे 17 जून रोजी त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. 17 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.