अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सी-प्लेन धारोई धरणात उतरले असून मोदी रस्ते मार्गाने अंबाजी मंदिरात दर्शनासाठी निघाले आहेत. मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या साबरमती नदीमधून सी प्लेनने धारोईला रवाना झाले होते. धारोई धरण मेहसाणा जिल्ह्यात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून आज दुपारी प्रचारतोफा थंडावतील.
नरेंद्र मोदी त्याच सी प्लेनने दुपारी 2.30 वाजता अहमदाबादला परततील. विरोधकांना गुजरातचा विकास दाखवणे तसेच सरकारकडून जलमार्ग विकसित करण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहे ते लक्षात आणून देणे हा मोदींचा सी प्लेन प्रवासामागचा उद्देश आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी विमानतळ उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या सरकारने सी प्लेन मार्ग विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे असे मोदींनी सांगितले.
क्वेस्ट कोडियाक प्रकारचे हे सी प्लेन आहे. एकाचवेळी 9 ते 15 जण या विमानातून प्रवास करु शकतात. उड्डाण आणि लँडिंगसाठी या विमानाला फक्त 300 मीटरची धावपट्टी लागते. हे विमान पाण्यावर तरंगूही शकते त्यामुळे हे विमान पाण्यातून उड्डाण आणि लँडिंग करु शकते.
नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.