हैदराबाद - जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी भारत दौ-यावर आलेल्या इवांका ट्रम्पला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी एक सुंदर लाकडी पेटी भेट दिली. ही पेटी सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे. हैदराबाद भेटीची आठवण म्हणून इवांका ट्रम्पला ही सुंदर भेटवस्तू देण्यात आली.
सॅडली हस्तकला मूळची गुजरातमधल्या सूरत इथली आहे. तिथे सॅडली हस्तकलेपासून वस्तू तयार केल्या जातात. उत्तम कौशल्य असलेले कलाकार सॅडली हस्तकलेच्या वस्तू तयार करतात. सॅडली हे गुजरातच्या हस्तकलेचे उत्तम उदहारण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अन्य देशातल्या मोठया नेत्यांना भेटतात तेव्हा ते आवर्जून भारतीय संस्कृती, परंपरेशी संबंधित खास वस्तू भेट म्हणून देतात. मोदींनी इवांका ट्रम्प यांना सुद्धा अशीच लक्षात राहिल अशी भेट दिली आहे. फोटो फ्रेम, ज्वेलरी बॉक्स, दरवाजे, खिडक्या आणि फर्निचरचे सौंदर्य वाढवण्यासाठी सॅडली डिझाईनचा वापर केला जातो.
19 व्या शतकात ब्रिटनमध्ये सॅडली हस्तकला लोकप्रिय होती. त्यावेळी भारतातून सॅडली हस्तकलेच्या वस्तू ब्रिटनमध्ये आयात केल्या जायच्या. मुंबई शहर त्यावेळी सॅडली वस्तूंच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. ब्रिटनमध्ये 'बॉम्बे बॉक्सेस' म्हणून या वस्तू ओळखल्या जायच्या.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा सुद्धा अशाच प्रकारचा एक बॉक्स भेट म्हणून दिला होता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये हा बॉक्स बनवण्यात आला होता. बारीक नक्षीकाम केलेला हा बॉक्स तयार करण्यासाठी सात महिने लागले होते.