ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. पहिल्या वर्षी विकास दर वाढल्याने देशाने गमावलेला विश्वास पुन्हा मिळवला आहे असे सांगत मोदींनी पत्राद्वारे 'मन की बात' केली आहे.
मोदी सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले असून या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहीले आहे. देशभरातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये हे पत्र जाहिरात स्वरुपात छापण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक व धोरण आधारित प्रशासन हे आमचे मूलभूत सिद्धांत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. सत्तेवर आलो तेव्हा आर्थिक स्थिती डळमळीत होती, महागाई वाढत होती पण आता चित्र बदलत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मृदा आरोग्य कार्ड, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान अशा नवनवीन योजना राबवत असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.