नवी दिल्ली – मणिपूरच्या घटनेवरून संसदेत गेल्या २ दिवसांपासून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर निवेदन सादर करावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यात विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो नरेंद्र मोदींचा पहिल्या कार्यकाळात केलेल्या भाषणाचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषण देण्यासाठी उभे होते. त्यांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर खडेबोल सुनावले होते. ४५ सेकंदाच्या या व्हिडिओत नरेंद्र मोदी आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी म्हणजे ५ वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजकीय भविष्यवाणी केली होती. २०२३ मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील असं त्यांनी म्हटलं होते. आज तिच गोष्ट खरी ठरताना दिसत आहे.
२०२३ मध्ये पुन्हा...
आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. २०१९ मध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. तारीख होती ७ फेब्रुवारी २०१९. मोदी म्हणाले होते की, तुम्ही इतकी तयारी करा, इतकी तयारी करा की २०२३मध्ये पुन्हा तुम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळेल. मोदींच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. शेजारीच बसलेले मंत्री राजनाथ सिंहही हसत होते.
ही अहंकाराची भाषा, खरगेंची टीका
त्यावेळी विद्यमान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेत बसले होते. त्यांनी पटकन ही अहंकाराची भाषा असल्याची टीका मोदींवर केली. तेव्हा काँग्रेसकडे बोट दाखवत मोदी म्हणाले की, अहंकाराचा परिणाम म्हणून ४०० हून ४० झाला आणि आमचा सेवाभावाचा परिणाम म्हणून २ वरून सत्ताधारी पक्षात बसलो. तुम्ही कुठून कुठे पोहचला. आभासी जगात जगावं लागतंय. जुलै २०१८ मध्ये विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्याच्या समर्थनार्थ सभागृहात १२६ मते पडली तर अविश्वास प्रस्तावाविरोधात ३२५ खासदारांनी मतदान केले.