श्रीनगर - पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने पुंछ विभागात नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने रविवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, या हेलिकॉप्टरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या हद्दीत घुसलेल्या या हेलिकॉप्टरमधून पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रझा फारुख हैदर हे प्रवास करत होते. दरम्यान, नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी हे हेलिकॉप्टर पाडण्याची तयारी सुरू केली होती. तसेच या हेलिकॉप्टरला पिटाळून लावण्यासाठी त्याच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला होता. हे हेलिकॉप्टर पाडले गेले असते तर मोठी दुर्घटना घडून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असता. संरक्षण विभातागील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर सुमारे दोन ते तीन मिनिटे भारताच्या हद्दीत होते. . जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या या हेलिकॉप्टरने घुसखोरी केली होती. रविवारी (30 सप्टेंबर) दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घुसले. ही बाब भारतीय जवानांच्या लक्षात येताच, त्यांनी प्रत्युत्तर म्हणून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून दोन फायटर जेट्सही रवाना करण्यात आले होते. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर माघारी परतले होते.
सूत्रांनी सांगितले की, "आमच्या जवानांनी जेव्हा हे हेलिकॉप्टर पाहिले. तेव्हा ते बऱ्याच उंचावर होते. त्यानंतर जवानांनी जमिनीवरूनच त्या हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या हद्दीत गेले. पाकिस्तानमधून येत असलेल्या काही वृत्तांनुसार त्यात पीओकेचे पंतप्रधान असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आम्ही याला दुजोरा देत नाही."