नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) ही देशाने पाहिलेली सर्वांत दिशाहीन आघाडी असल्याचे टीकास्त्र सोडले. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’ यांसारख्या नावांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या नावांतही ‘इंडिया’ आहे. केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही टीका केली. बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होणार असून, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळणे निश्चित आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तर मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर चर्चेसाठी सभागृहात योग्य वातावरण निर्माण केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
काँग्रेसचा पलटवार
पंतप्रधान विरोधकांना विरोध करताना ‘इंडिया’ शब्दाचा द्वेष करू लागले आहेत, असा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला.
पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी ट्वीट केले की, ‘तुम्ही काँग्रेसविरोधी इतके आंधळे झाले आहात की, तुम्ही ‘इंडिया’चा द्वेष करू लागला आहात.
आज निराश होऊन तुम्ही इंडियावरच हल्ला केल्याचे मी ऐकले आहे.’
‘ते’ हताश, निराश...
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधानांनी विरोधकांच्या हताश आणि निराश वागणुकीवर बोट ठेवले. विरोधी पक्षांची वृत्ती हे दर्शवते की, त्यांनी आगामी अनेक वर्षे विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
विरोधक बेजबाबदार पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्य विरोधी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेही नाव ए. ओ. ह्यूम या इंग्रजाने ठेवले होते. लोक आता परिपक्व झाले आहेत आणि अशा नामकरणाने दिशाभूल होणार नाही. भाजपनेे विरोधी पक्षांवर संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप केला. त्याबद्दल मोदी म्हणाले की, विरोधक आता अधिकच बेजबाबदार झाले आहेत. सत्ताधारी पक्षाने अधिक जबाबदारीने वागणे अत्यावश्यक झाले आहे.