नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका आपल्यासमोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. दरम्यान देशांत लसीकरण मोहीमही सुरू करण्यात आली आहे. त्यात, एकाच दिवसात 69 लाख लसींचा रेकॉर्डब्रेक कार्यक्रम आज पूर्ण करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय. तसेच, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही शाबास इंडिया... म्हणत लसीकरण मोहिमेचं कौतुक केलंय.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,99,35,221 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1422 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,88,135 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू करण्यात आलं आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल 69 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासीयांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, वेल डन इंडिया असेही मोदींनी म्हटलं. देशात एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्योजक आनंद महिंद्र यांनीही ट्विट करुन शाबास इंडिया... असे म्हटले आहे. तसेच, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जलद गतीने लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचंही महिंद्र यांनी ट्विट करुन म्हटलंय.
लसीकरण मोहिमेला गती
देशात केंद्र सरकारतर्फे आजपासून मोफत लसीकरण केलं जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली. अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये एका लसीकरण केंद्राचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व देशवासीयांचं लसीकरण करण्याचं आमचं ध्येय लवकरच गाठणार आहोत. केंद्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.